धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाचे कोरोना काळात उल्लेखनीय व अनुकरणीय कार्य

धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाचे कोरोना काळात उल्लेखनीय व अनुकरणीय कार्य

 जागतिक महामारी सदृश्य कोरोना विषाणू संसर्गाने भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण केली आहे.मागील दीड वर्षापासून आपण सर्वजण कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये अडकून पडलो असून त्यामध्ये अनेकांना या व्याधीचा संसर्ग झाला त्यामध्ये अनेक जण बरे झाले तर काहींचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. भारतासारख्या खंडप्राय व लोकसंख्या अधिक प्रमाणात असलेल्या देशात केंद्र शासन व संबंधित राज्य शासन यांच्या माध्यमातून कोविंड संदर्भात मास्क वापरणे,सुरक्षित अंतर ठेवणे,हात निर्जंतुक करून घेणे,रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठीच्या विविध उपाययोजना राबविणे,लसीकरण मोहीम राबविणे यासोबतच कोरोना पाॅजिटिव्ह रुग्णांसाठी सर्व उपचार-शस्त्रक्रिया यासंबंधीची अंमलबजावणी अन्य राष्ट्रांच्या तुलनेत अत्यंत प्रभावीपणे करण्यात येत आहे.या काळात सर्वच शासकीय यंत्रणांवर पडलेला ताण आणि त्यांनी केलेले कार्य निश्चितपणे कौतुकास्पद व गौरवास्पद आहे.विशेषतः सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने रात्रंदिवस केलेली रुग्णसेवा व आरोग्य सेवा वाखानण्याजोगी आहे.विविध शासकीय यंत्रणा सोबतच या कालावधीत अनेक नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत खाजगी संस्था-व्यक्ती,अशासकीय स्वयंसेवी संस्था व पत्रकार यांच्या माध्यमातून सुद्धा भरीव कार्य झालेले आहे. सद्यस्थितीत सर्वत्र केवळ कोवीड रुग्णांकरिता केलेल्या कामाची नोंद व चर्चा होत असताना  नैसर्गिक आपत्ती,कोरोना विषाणूने घातलेले थैमान व हलाखीची आर्थिक परिस्थिती यामुळे पिचलेल्या ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबाला तथा नाॅन कोवीड रुग्णांना आधार मिळावा या उदात्त हेतूने धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर,जिल्हा-लातुर च्या माध्यमातून केलेले कार्य सुद्धा अनुकरणीय व तितकेच उल्लेखनीय असे आहे.
कोरोना पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांसाठी महाविद्यालय-रुग्णालयाची इमारत क्वारंटाईन सेंटर करीता 12 मार्च 2020 पासून अधिग्रहित करण्यात आली.दरम्यानच्या काळात कोरोना विषाणू संसर्गाच्या उपचाराची अल्प,मध्यम आणि तीव्र अशी त्रिस्तरीय पध्दतीचा विचार करता शासकीय पातळीवर अनेक बैठकांच्या माध्यमातून विविध पर्यायांचा विचार करून सामान्य रुग्णालय,उदगीर येथे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल घोषित झालेले असतानासुद्धा कोवीड रुग्णांच्या उपचाराचे केंद्र धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर येथे करावे आणि सामान्य रुग्णालय,उदगीर येथे नाॅन कोवीड रुग्णांकरिता आरोग्य सेवा सुरू ठेवाव्या असे प्रयत्न शासकीय पातळीवर सुरू असतानाच अचानकपणे कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये उदगीर येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आणि दिनांक:-16 एप्रिल 2020 रोजी तात्काळ म्हणजे केवळ सहा तासात सामान्य रुग्णालयाच्या नॉन कोविड अंतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णसेवा व आरोग्य सेवा यांचे स्थलांतर धनवंतरी आयुर्वेद महाविद्यालयाच्या सर्व भौतिक सोयी-सुविधा आणि तसेच वैद्यकीय उपकरणांनी युक्त इमारतीत करण्यात आले व ते आजतागायत निःशुल्क सुरू आहे.

कोरोनाच्या या महामारीमध्ये प्रत्येक जण विविध घटनांचा साक्षीदार होतच आहे याची अनुभुती आपणा सर्वांनाच येत आहे.परंतु या महामारीमध्ये निस्वार्थपणे आणि निष्काम भावनेतून समाजाला व प्रशासनाला सढळ हाताने मदत करून साथीदार होणारे क्वचितच लोक असतात त्यामुळे क्रियाशील साथीदार होण्यालाच प्राधान्य व प्राथमिकता देऊन तथा कर्तव्यपरायणतेच्या भूमिकेतून आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून लोकाभिमुख वृत्ती असणारे बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर या संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव,कृतीशील व विधायक दृष्टिकोण बाळगणारे सचिव आमदार बाबासाहेब पाटील व सकारात्मक दुरदृष्टिकोनातून कार्य करणारे सहसचिव अविनाश जाधव यांनी या भयावह संकटकाळात त्वरित पुढाकार घेऊन शासकीय यंत्रणांना म्हणजेच पर्यायाने समाजाला योग्य ते सहकार्य करण्याची सुचना प्राचार्य डॉ.दत्तात्रय विनायकराव पाटील यांना दिली.त्यामुळेच धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाच्या इमारतीतील सुसज्ज व सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशा बाह्यरुग्ण विभाग,आंतररुग्ण विभाग,अपघात विभाग,औषधी विभाग,प्रसूती कक्ष,शस्त्रक्रिया विभाग,ईसीजी रूम,सोनोग्राफी रूम,पॅथॉलॉजी लॅब,ईत्यादी विभागांमध्ये सामान्य रुग्णालयाच्या नाॅन कोवीड अंतर्गत येणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा मागील सव्वा वर्षापासून निःशुल्क सुरू आहेत.कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये सामान्य रुग्णालय,उदगीर येथे आवश्यकतेनुसार विविध ठिकाणाहून बदली होऊन आलेल्या अनेक वैद्यकीय अधिकारी,नर्सिंग स्टाफ,पॅरामेडिकल स्टाफ यांना राहण्याकरिता जागा मिळत नव्हती त्या कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था सुद्धा महाविद्यालयाच्या वसतिगृहात निशुल्क करण्यात आली.तसेच महाविद्यालयाच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी प्रधानमंत्री सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये सुद्धा तीन लाख रुपयांची आर्थिक देणगी सुद्धा या काळात देण्यात आली आहे.
सामान्य रुग्णालयाला भौतिक सोयी-सुविधा तथा वैद्यकीय उपकरणांनी युक्त इमारत निःशुल्क देऊन न थांबता प्राचार्य डॉ दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तथा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनाच्या आवश्यकतेनुसार  महाविद्यालयातील व रुग्णालयातील काही डॉक्टर्स,पॅरामेडिकल स्टाफ,आंतरवासियता प्रशिक्षणार्थी,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व अन्य कर्मचारी या काळात नाॅन कोवीड रुग्णांच्या उपचाराची दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.वस्तुतः ग्रामीण भागात आरोग्याच्या दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे,सद्यस्थितीत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचे तसेच त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करणे,संबंधित रुग्ण मानसिकरित्या खचणार नाही याकरिता त्यांच्याशी संवाद साधत राहून त्यांच्यातील नकारात्मक विचार बाजूला सारणे,मनात भय न बाळगता रुग्णांमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करणे,कोरोनावर आपण सहज मात करू शकतो अशा पद्धतीचा आत्मविश्वास निर्माण व्हावा याकरिता समुपदेशन करीत आहेत.त्यासोबतच कोरोना रुग्णांसाठी व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी  किंवा सामान्य नागरिकांसाठी रोगप्रतिकारक्षमता वाढण्यासाठी आयुष काढ्याचे निशुल्क वितरण करण्यात येत आहे तसेच विविध चिकित्सा पद्धतींच्या तज्ञ डॉक्टरांच्या ऑनलाईन व्याख्यानाच्या माध्यमातून आरोग्य विषयक व कोवीड विषयक जनजागरण मोहीम,रोगनिदान व औषधोपचार शिबिर तथा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली आहेत.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने तथा शिरूर ताजबंद येथील मोहनराव पाटील आयुर्वेद रुग्णालयाच्या माध्यमातून ऑक्सिजनयुक्त पन्नास खाटांचे निःशुल्क डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करून ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबाला व कोरोनाग्रस्त रुग्णांना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला.त्या ठिकाणी सुध्दा अनेक कोवीड पाॅजिटिव्ह रुग्ण यशस्वीरित्या उपचार घेऊन बरे झाले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार नागरिकांच्या कोवीड लसीकरणासाठी महाविद्यालयाने अन्य एका इमारतीत निशुल्क जागा उपलब्ध करून दिली असून तेथे महाविद्यालयातील डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफ यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना म्हणून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी पंचवीस खाटांचे ऑक्सिजनयुक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व पंचवीस खाटांचे आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले असून तेथे सार्वजनिक आरोग्य विभाग व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहकार्याने निःशुल्क सेवा पुरविण्यात येणार आहेत.

एकंदरीतच बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब जाधव,सचिव आ.बाबासाहेब पाटील,सहसचिव अविनाश जाधव व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन आणि अहर्निश सेवामहे या उक्तीप्रमाणे आणि मानवताधर्म तथा वैद्यकीय व्यवसायिकांकरिता घालून दिलेली आचारसंहिता व प्रतिज्ञा याचे तंतोतंत पालन करीत सहकारी डाॅक्टर्स व रुग्णालयीन-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मदतीने गोरगरीब व गरजु रुग्ण,सामान्य नागरिक व समाजाच्या आरोग्यविषयक समस्यांचे निवारण करण्यासाठी सक्रिय योगदान देणारे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील हे निश्चितपणे निष्काम कर्मयोगी आहेत.प्राचार्य पदासोबतच विविध शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून  पदाधिकारी किंवा सदस्य म्हणून कोवीड व नाॅन कोवीड रुग्णांकरिता अविरतपणे व अखंडितपणे कार्यरत असलेल्या डॉ.दत्तात्रय वि.पाटील यांचे आज प्रसिद्ध भारतीय चिकित्सक भारतरत्न डाॅ.बी.सी.राॅय यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणार्‍या एक जुलै-डाॅक्टर्स डे चे औचित्य साधून मनःपूर्वक अभिनंदन.तसेच धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात होत असलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण,स्तुत्य व प्रेरणादायी तथा समाजोपयोगी कार्याबद्दल संचालक मंडळ,प्राचार्य,डाॅक्टर्स व अन्य कर्मचारी यांचे अंतःकरणपूर्वक आभार व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
शब्दांकन:- भगवान सगर,शंकर बोईनवाड

टिप्पण्या