*एक सेवाभावी व्यक्तिमत्व : गोपाळराव कांबळे*
------------------------------------
सेवाभावी वृतीने आयुष्यभर विद्यार्थी घडवीणारे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षण देणारे सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणजे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. गोपाळराव कांबळे हे होत. आज शिक्षक दिन त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख.
श्री गोपाळराव मरेप्पा कांबळे यांचा जन्म दि.2० जानेवारी १६६३ रोजी लखनगाव ता. भालकी जि. बिदर येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक ते माध्यमिक पर्यंतचे शिक्षण जि. प. हायस्कूल लखनगाव, उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी महाविद्यालय उदगीर, अध्यापन पदविका मराठी बी. टी. आय. बिदर येथून पूर्ण केली., पदवी व पदव्युत्तर शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे बहिस्थ पध्दतीने घेतले.बी.एड.व एम.एड.चे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, येथुन घेतले. एम. ए. राज्यशास्त्र ही पदवीही त्यांनी प्राप्त केली.श्री. कांबळे सर हे १२ वी ला असताना पाच वेळा नापास झाले पण शिक्षणाची जिद्द सोडली नाही. प्रारंभी ते अध्यापन पदविका पास झाल्यावर दि. ११ जून १६८३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय उदगीर येथे रुजू झाले. त्यानंतर ते या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले अलीकडेच ते सेवेतून निवृत्त झाले. शाळा ही त्याकाळी विनाअनुदानित असल्यामुळे सरांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी शासनाने लावून दिलेल्या सर्व कार्यक्रम व उपक्रमाची अंमलबजावणी करून शैक्षणिक गुणवतेत शाळा आघाडीवर नेली. शाळाबाह्य मुलांना स्वखर्चाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शाळेच्या प्रवाहात आणले. शिष्यवृत्ती, नवोदय व इतर स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी
घडविले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन केले. मान्यवरांना शाळेत बोलावून त्यांचे विचार ऐकवले. २००५ मध्ये उदगीर शहरातील भटक्या विमुक्तांच्या जवळपास ४३ विद्यार्थ्यांना त्या त्या ठिकाणाहून वाजत गाजत शाळेत आणून प्रवेश दिला. त्यासाठी प्रथम त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. त्या ४३ पैकी २२ विद्यार्थी शिक्षण घेण्यात यशस्वी झाले. काहींनी व्यवसाय थाटला.भटक्या विमुक्त लोकांना महात्मा फुले महामंडळाकडून कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले याकामी नगरसेवक अनिल मुदाळे व सामाजिक कार्यकर्ते धनाजी बनसोडे यांचे सहकार्य मिळाले.. पाणी फाउंडेशन व वृक्षलागवडी मध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. सरांनी विविध संघटनेत महत्वपूर्ण कार्य केले.
श्री. गोपाळराव कांबळे यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांचा सन्मान केला. प्राचार्य डॉ. ना. य. डोळे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार, मुख्याध्यापक
फोरमचा उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार, जिल्हास्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, मदत संघटना नागपूरचा समाज भूषण पुरस्कार, एकता सेवाभावी संस्था परभणी चा पुरस्कार, साने गुरुजी नांदेड कथामालेचा पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांच्या नावे आहेत. सरांचे विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. सरांनी विद्यार्थी घडवीत असताना आपल्या कुटुंबाकडेही विशेष लक्ष दिले. त्यांचा मुलगा सुमेर कांबळे हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे.तर स्नुषा दीपाली सुमेर कांबळे हया सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. व मुलगी प्रिती कांबळे ही एम.डी. आहे. पत्नी सौ. शोभाताई नेत्रगावकर हया लालबहादूर शास्त्री विद्यालय उदगीर येथे शिक्षिका आहेत. श्री. गोपाळराव कांबळे गुरुजींचे शैक्षणिक कार्य हे इतरांना प्रेरणदायीच आहे. आज शिक्षक दिनानिमित्त त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देवूया !
*शंकर बोईनवाड*
पत्रकार, उदगीर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा