*नागराळ येथे श्री गुरुलिंगेश्वर मठाच्या जिर्णोद्धाराचा ऐतिहासिक सोहळा**श्री श्री श्री १००८ सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते भूमिपूजन; हजारोंच्या साक्षीने धर्मसंस्कृतीचा जागर*
*नागराळ येथे श्री गुरुलिंगेश्वर मठाच्या जिर्णोद्धाराचा ऐतिहासिक सोहळा*
*श्री श्री श्री १००८ सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते भूमिपूजन; हजारोंच्या साक्षीने धर्मसंस्कृतीचा जागर*
देवणी : देवणी तालुक्यातील नागराळ येथील प्राचीन व ऐतिहासिक श्री गुरुलिंगेश्वर मठ संस्थान येथे मठाच्या जिर्णोद्धार व नव्या बांधकामाचा भव्य धार्मिक सोहळा सोमवारी अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. उज्जैनी महापीठाचे परमपूज्य श्री श्री श्री १००८ जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते मठाच्या जिर्णोद्धाराचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्यास नागराळ गावासह देवणी तालुक्यातील तसेच परिसरातील अनेक गावांमधून हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहिल्याने संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.नागराळ येथील गुरुलिंगेश्वर मठाला तब्बल ७५ वर्षांनंतर मठाधीश लाभल्याचा ऐतिहासिक क्षण या सोहळ्यामुळे साकार झाला. नागराळ येथील मठाधीश म्हणून श्री म. नि. प्र. सिद्धलिंग महास्वामीजी यांच्या रूपाने गुरुपरंपरेचा नवा अध्याय सुरू झाला असून हा क्षण नागराळ गावासाठी अभिमानाचा मानला जात आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी पारंपरिक वेदघोष, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींसह भूमिपूजनाने झाली. त्यानंतर आयोजित धर्मसभेत विविध संत-महंत, शिवाचार्य महाराज व धर्मगुरूंनी धर्म, संस्कृती, गुरू परंपरा आणि समाजजीवनातील आध्यात्मिक मूल्यांवर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रभावी संचलन प्रा. रेवण मळभागे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक बसवराज पाटील नागराळकर यांनी करून मठाच्या इतिहासाची माहिती दिली.यावेळी बोलताना बसवराज पाटील नागराळकर यांनी सर्व धर्म समभावाची परंपरा जपत नागराळ गावातील सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने हा भव्य धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी गावातील ऐक्य, बंधुता आणि सामाजिक सलोखा यांचा उल्लेख करत हा कार्यक्रम संपूर्ण गावाच्या सहभागातून यशस्वी झाल्याचे नमूद केले.
या वेळी त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, नागराळ मठाच्या जिर्णोद्धाराचा हा ऐतिहासिक सोहळा पाहण्याचे स्वप्न अनेक ज्येष्ठांनी पाहिले होते. मात्र या क्षणी आपल्या वडिलांची उपस्थिती नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी ऋषितुल्य स्व. मलशेट्टी आप्पा पाटील यांची आठवण काढली. “आज हा भव्य सोहळा पाहून ते नक्कीच आनंदित झाले असते,” असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले.धर्मसभेत बोलताना अनेक संत-महंतांनी गुरू परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. सोनपेठ येथील नंदकिशोर महाराज यांनी सांगितले की, “धर्माचे पालन केले तर जीवनातील सर्व सुख प्राप्त होते. समाजात धर्म वाढवायचा असेल तर मठ आणि धार्मिक संस्था मजबूत केल्या पाहिजेत.”
उदगीर येथील शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “जगात गुरूपेक्षा मोठे स्थान दुसरे नाही. परमेश्वराशी जोडणारा सर्वात मोठा मार्ग म्हणजे गुरू होय.”या प्रसंगी श्री श्री श्री १००८ सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या प्रभावी भाषणातून धर्म, गुरूपरंपरा आणि निसर्ग यांचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, “वेळ येणे अत्यंत महत्त्वाचे असते. नागराळ मठाला तब्बल ७५ वर्षांनंतर मठाधीश लाभले हा अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक क्षण आहे.”
आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगताना धर्माला आईचा दर्जा दिला जातो असे सांगितले. विज्ञान आणि निसर्ग यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “विज्ञान कितीही प्रगत झाले तरी धरती मातेसमोर ते लहानच आहे. विज्ञान एका बीजाचे अनेक बीज तयार करू शकत नाही, परंतु धरती माता एका बीजापासून असंख्य बीज निर्माण करते.”
तसेच त्यांनी गोमातेचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व अधोरेखित करत भारतीय संस्कृतीतील निसर्गपूजेची परंपरा समजावून सांगितली. समाजाने एकत्र येऊन धर्मसंस्कृती जपावी, असा संदेशही त्यांनी दिला.या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज उपस्थित होते. तसेच नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांच्यासह अनेक संत-महंत व धर्मगुरूंची उपस्थिती लाभली. सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी आयोजित शिवकिर्तन कार्यक्रमाला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला. प्रसिद्ध कीर्तनकार शिवशरण गुरूजी रटकलकर यांनी केलेल्या कीर्तनाने वातावरण भक्तिमय झाले. तसेच परिसरातील विविध गावांतील भजनी मंडळांनीही सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंदन पाटील नागराळकर यांनी केले.
नागराळ येथील श्री गुरुलिंगेश्वर मठाच्या जिर्णोद्धाराचा हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून गुरूपरंपरेचा जागर, सर्व धर्म समभावाचा संदेश आणि नागराळ गावाच्या एकतेचे प्रतीक ठरला असल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.
*दयानंद कांबळे नागराळकर*
7887827886
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा