बालाजी रेड्डी यांच्यामुळे शिवसेनेला गती मिळाली - स्वप्नील अण्णा जाधव
उदगीर (प्रतिनिधी)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गतिमान करण्यासाठी आणि संघटन उभारण्यासाठी जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी यांनी घेतलेले परिश्रम आणि त्यांनी संघटन कुशल नेतृत्व दाखवत सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन, "गाव तिथे शिवसेना आणि घर तेथे शिवसैनिक" मोहीम राबवल्यामुळे लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात शिवसेनेने चांगलेच बाळसे धरले आहे. असे विचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल (अण्णा) अनिल जाधव यांनी व्यक्त केले.
बालाजी भाऊ रेड्डी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून स्वप्नील अण्णा जाधव यांच्या मित्र परिवाराकडून बालाजी रेड्डी सत्कार आयोजित करण्यात आला. या सत्कार प्रसंगी बालाजी रेड्डी यांना अभिष्टचिंतन करतानाच स्वप्निल अण्णा जाधव यांनी बालाजी रेड्डी यांनी ग्रामीण भागामध्ये शिवसेनेसाठी किती कष्ट घेतले, आणि संघटन उभारणीसाठी त्यांनी केलेल्या एकूण कार्याचा आढावा घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा बळ देण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी तन, मन, धनाने परिश्रम घेणे काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टीने संघटन कुशल नेतृत्व असलेल्या जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी यांनी प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केली आहे.
शिवसेना ही लोककल्याणकारी योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणारी एक प्रभावी यंत्रणा बनावी, आणि लोककल्याण करावे. विविध योजनेचे खरे लाभार्थी वंचित राहू नयेत. या दृष्टीने त्यांना सहकार्य करावे. ही भूमिका घेऊन बालाजी रेड्डी काम करत आहेत. त्यांचे काम निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. आई तुळजाभवानी त्यांना उदंड दीर्घायुष्य देवो, अशा शुभेच्छा ही याप्रसंगी स्वप्नील अण्णा जाधव यांनी दिले आहेत.
या सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी नितीन मामा डांगे, हनुमंत दादा जाधव आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा