*किरण बापूरे यांच्या ‘दिलकश रुबाईयां’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन‘*
उदगीर :
येथील बिदर गेट परिसरातील हॉटेल आनंद येथे कवी हावगीराव उर्फ किरण बापूरे लिखित ‘दिलकश रुबाईयां’ या हिंदी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आनंदी मॉर्निंग ग्रुप आणि जयवंतराव पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यास साहित्य, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गट शिक्षण अधिकारी के. आर. शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक शंकर बोईनवाड, जमहूर ज्युनियर कॉलेजचे प्रा. महेमूद अली जहागिरदार तसेच आनंदी गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष शरद कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी किरण बापूरे यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ कला शिक्षक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्रीधर दिगंबर जाधव यांना “राज्य आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६” जाहीर झाल्याबद्दल गौरविण्यात आले. बारावी परीक्षेत ९८ टक्के गुण आणि जेईई परीक्षेत ९९.५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी अलोक अनिल मालू याचाही विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. महेमूद अली जहागिरदार यांनी ‘दिलकश रुबाईयां’ या काव्यसंग्रहावर अभ्यासपूर्ण व मार्मिक समीक्षा सादर केली. कवी किरण बापूरे यांनी आपल्या रुबायांमधून मानवी भावना, प्रेम, सामाजिक वास्तव आणि समकालीन विषयांचे प्रभावी चित्रण केल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे डॉ. अनिल भिकाने यांनी कवी किरण यांच्या साहित्यिक कार्याचे कौतुक करताना, “त्यांचे लेखन समाजाला विचारप्रवृत्त करणारे असून नशिबापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवण्याचा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे आहे,” असे प्रतिपादन केले.
कवी किरण बापूरे यांनी मनोगतातून या काव्यसंग्रहाच्या निर्मितीमागील भावविश्व आणि साहित्यप्रवास उलगडून सांगितला. त्यांनी सर्व आयोजक, साहित्यप्रेमी आणि उपस्थितांचे आभार मानले. यावेळी श्रीधर जाधव व माधवराव फावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. शरद कुलकर्णी यांनी “प्रेमात डोळस माणूसही आंधळा होतो,” अशी मिश्किल टिप्पणी करत उपस्थितांची दाद मिळवली.
अध्यक्षीय समारोपात के. आर. शिंदे यांनी ‘दिलकश रुबाईयां’ हा उत्कृष्ट काव्यसंग्रह असून साहित्यप्रेमींनी तो आवर्जून वाचावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव मुरलीधर जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश कोरे यांनी मानले.
या सोहळ्यास अनिल पत्तेवार, मिर्झा वहीदली, झुंगा स्वामी, राम विलास नावंदर, अमृतराव पाटील, माणिकराव शिंदे, विश्वनाथराव बिरादार, विश्वनाथराव मुडपे, रमाकांत बनशेळकीकर, प्राचार्य विजयकुमार पाटील, बाबुराव माशाळकर, प्रा रमाकांत मध्वरे, दीपक बलसुरकर, लहूदास याचावाड, हकिमसाहेब , व्यंकटराव बिरादार, विष्णू लोया, रमेश गोरे, शेषराव इंगोले, प्रकाश बिरादार, रंगराव मोरे , बंडू बेद्रे, अब्दुल हकिम, गणपतराव नकाते यांचे सह जयवंतराव पाटील मित्र मंडळ,आनंदी गुड मॉर्निंग ग्रुप, जिव्हाळा ग्रुप, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, साहित्यिक, पत्रकार, वाचक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नेटकेपणाने करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा